राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रमाला तीर्थक्षेत्राचा “अ” दर्जा कधी ?

इंजि.अक्षय ईस्तारीजी कहालकर यांची सरकारला विचारणा.
भंडारा :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमास तीर्थक्षेत्राचा “अ” दर्जा कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होताच सरकार खडबडून जागे झाले. वने व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तीर्थक्षेत्राचा “अ” दर्जा देण्यात यावा अशी मागणी एका पत्राद्वारे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. पण प्रत्यक्षात खरंच गुरुकुंज आश्रमास तीर्थक्षेत्राचा “अ” दर्जा देणार की फक्त आश्वासनच देत राहणार अशी विचारणा गुरुदेव प्रेमी इंजि.अक्षय ईस्तारीजी कहालकर यांनी सरकारला केली आहे.*

स्वातंत्र्यपूर्व काळात व 1942 च्या स्वातंत्र्य युद्धात मोलाची कामगिरी बजावणारे, तरुणांना संघटित करून त्यांच्यामध्ये देशाभिमान जागवणारे एकमेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाने अनेक तरुण पेटून उठले होते व इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता, त्या महान राष्ट्रसंताच्या कार्याला सरकार, विरोधी पक्ष व लोकप्रतिनिधी जर विसरले असतील तर कसं होणार ? गुरुकुंज आश्रम मोझरी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीमधून अवघ्या महाराष्ट्रात नावलौकिक असणारे एकमेव तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी देश व विदेशातील जवळपास पाच लाखांच्यावर भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त नसल्यामुळे येथील परिसराचा पाहिजे तेवढा विकास झाला नाही. तसेच जवळपासच्या छोट्या मोठ्या तीर्थक्षेत्रांना दर्जा देण्यात आला मात्र ह्या आश्रमाला दर्जा प्राप्त नसावा ही आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे त्यामुळे गुरुदेव भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण असून सरकारने व विरोधी पक्षांनी राजकारण न करता तीर्थक्षेत्राचा “अ”दर्जा देण्यात यावा अशी मागणी गुरुदेव भक्तांनी केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी अनेकदा पत्र व्यवहार करून सुद्धा फक्त आश्वासने देऊन सरकार वेळ मारून नेत आहे त्यामुळे ह्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात व गुरुदेव भक्तांचा अंत बघू नये व फक्त आश्वासने देवू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गुरुदेव प्रेमी इंजि.अक्षय कहालकर यांनी केली आहे.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त लाखो भावी ह्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेऊन तीर्थक्षेत्राला “अ” दर्जा देण्यात यावा.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













