आरएसपी प्रशिक्षण शिबिरात शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे! प्राथमिक उपचार व रस्सी गाठींचे प्रात्यक्षिक;
प्रतिनिधी
ठाणे :- ठाणे वाहतूक उपआयुक्तालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आरएसपी (Road Safety Patrol) शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या सहाव्या दिवशी प्राथमिक उपचार, बचावकार्य आणि रस्सी गाठींच्या विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या उपक्रमाला प्रशिक्षणार्थी शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.महाराष्ट्र पोलीस विभाग व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आयोजित या प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटना, नागपूरचे कार्याध्यक्ष पितांबर महाजन,
खजिनदार श्री.शाम फाळके, राज्य प्रशिक्षण प्रमुख श्री.दीपक पोहरेकर, विभागीय उपाध्यक्ष नाशिक श्री.सिकंदर शेख, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा आरएसपी प्रसिद्धी प्रमुख डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील तसेच समाजसेवक माणिक पाटील उपस्थित होते.यावेळी आपत्तीच्या प्रसंगी जखमी अथवा बेशुद्ध व्यक्तीला सुरक्षित स्थळी कसे हलवावे, याबाबत विविध बचाव तंत्रांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामध्ये दोन हातांची बैठक, चार हातांची बैठक, मानवी कुबडी (Human Crutch), Pick-A-Pack, Fireman’s Lift, Fireman’s Crawl, Cradle Carry, Chair Knot Method तसेच Two Point Method यांसारख्या तंत्रांची माहिती देण्यात आली. अपघात, आग, भूकंप किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत या पद्धतींचा प्रभावी वापर करून जीवितहानी टाळता येते, असे मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले.रस्सी गाठींच्या १६ प्रकारांचे सविस्तर मार्गदर्शन प्रशिक्षणातील विशेष आकर्षण ठरले ते रस्सी गाठींच्या प्रात्यक्षिकाचे. प्रशिक्षक दीपक पोहरेकर व सिकंदर शेख यांनी रस्सीच्या सुमारे ४० प्रकारांपैकी १६ महत्त्वाच्या गाठींचे प्रात्यक्षिक करून दाखवले. बचावकार्य, उंच इमारतींमधून सुटका, पूरपरिस्थिती, नागरी संरक्षण कार्य आणि आपत्ती व्यवस्थापनात गाठींचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. योग्य गाठ निवडल्यास बचाव मोहिम अधिक सुरक्षित आणि परिणामकारक होते, याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.प्रात्यक्षिकातून शिक्षकांचा आत्मविश्वास वाढला केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष सरावावर भर देण्यात आल्याने प्रशिक्षणार्थी शिक्षकांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा आत्मविश्वास मिळाला. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, प्राथमिक उपचार व आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे सहभागी शिक्षकांनी सांगितले.ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशानुसार, जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी देवीदास महाजन व जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे. विभागीय समन्वय अधिकारी डॉ. मनिलाल रतीलाल शिंपी व नोडल अधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी बाळा साठे, सतीश पाटील, पौर्णिमा पाटील, संतोष भोईर आणि प्रा. सुभाष गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद शेलकर यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













