भंडारा तालुक्यातील निमगाव व पागोरा गावांचे तात्काळ पुनर्वसन करा

ग्रामसभेत ठराव पारित भंडारा जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
भंडारा :- आज दिनांक २८ जुलै २०२३ रोजी निमगाव येथील ग्रामपंचायत मध्ये तातडीची ग्रामसभा घेण्यात येऊन गोसेखुर्द धरणाच्या प्रकल्प बाधित क्षेत्रामध्ये येत असलेल्या निमगाव व पागोरा गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे अशा प्रकारचा ठराव निमगाव येथील ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आला तसेच भंडारा येथील जिल्हाधिकारी यांना निमगाव व पागोरा गावाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे याबाबतचा ठराव संबंधित अधिकाऱ्यामार्फत पाठविण्यात आला .याबाबत सविस्तर वृत्त असे की ,मौजा निमगाव व पागोरा गावामध्ये माहे ऑक्टोबर २०२१ पासून गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी साठवण प्रकल्पामध्ये वाढ होत असून प्रकल्पाच्या पाण्यामुळे 
मौजा निमगाव व पागोरा गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे .प्रकल्पाच्या पाण्यामुळे संपादित केलेली जागा, पर्यायी स्मशान भूमी, नळ जोडणीचे स्त्रोत पूर्णपणे पाण्यात बुडाले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील भिंतीपर्यंत प्रकल्पाचे पाणी लागलेले आहे .गावाच्या सभोवताल प्रकल्पाचे पाणी साठल्यामुळे गावामध्ये किटाणू, मच्छर व सापांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे .त्यामुळे गावात राहणे गावकऱ्यांना व पाळीव प्राण्यांना सुद्धा धोक्याचे झालेले आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या वॉटर बॅग मुळे मौजा निमगाव व पागोरा येथील ६० टक्के पेक्षा जास्त शेतजमीन संपादित करण्यात आलेली असून त्यामुळे ग्रामपंचायत निमगाव अंतर्गत मौजा निमगाव व पागोरा या दोन्ही गावाचे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व स्मशान भूमीची जागा बुडाली आहे .त्यामुळे सण २०१४ पासून गावकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सदर गावाला पुनर्वसन करण्याकरिता मंजुरी दिलेली होती. परंतु अजून पर्यंत निमगाव व पागोरा या गावाचे पुनर्वसन करण्याबाबत शासन स्तरावर कोणतीच कारवाई झालेली नाही .एकंदरीत या गावात मजुरांना कामे नाहीत. शेतकऱ्यांना शेती करता येत नाही. तलाठ्याकडून शेतकऱ्यांना सातबारा दिला जात नाही .त्यामुळे बँक सुद्धा कर्ज देत नाही. त्याचप्रमाणे या गावांमध्ये उपजीविकेचे कोणतेही साधन नाही तेव्हा जनतेला जीवन जगणे कठीण झालेले आहे .त्यामुळे शासनाच्या पुनर्वसन विभागाने निमगाव व पागोरा गावाकडे तात्काळ लक्ष घालून दोन्ही गावांचे पुनर्वसन करावे. याबाबत ग्रामसभेत ठराव घेऊन संबंधित अधिकाऱ्यामार्फत सभेच्या ठरवायची प्रत संबंधित जिल्हाधिकारी भंडारा यांना पाठविण्यात आलेली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













