रत्नागिरीत ग्रंथालय चळवळीचा महोत्सव ७ व ८ फेब्रुवारीला राज्यस्तरीय संयुक्त ग्रंथालय अधिवेशन
प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी :- दिनांक १७/०१/२०२६ ग्रंथप्रेमी आणि ग्रंथालय चळवळीशी संबंधित सर्वांसाठी आनंदाची बातमी असून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, कोकण विभाग ग्रंथालय संघ व रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ यांचे संयुक्त राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन शनिवार व रविवार, ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी ऐतिहासिक रत्नागिरी नगरीत भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे.या दोन दिवसीय अधिवेशनाचे अध्यक्षस्थान डॉ. गजानन कोटेवार, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ भूषविणार असून अधिवेशनाचे उद्घाटन माननीय नामदार उदयजी सामंत, उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून माननीय नामदार योगेशदादा कदम, राज्यमंत्री (गृह व महसूल) उपस्थित राहणार आहेत.अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माननीय दीपकशेठ गद्रे (उद्योजक) तर उद्घाटक मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री कृष्णाजी कुलकर्णी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अशोकजी गाडेकर (ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य), श्याम जोशी (विश्वस्त, ग्रंथसखा वाचनालय), प्रशांत पाटील (सहाय्यक ग्रंथालय संचालक, कोकण विभाग), गुलाबराव पाटील, सोपानराव पवार,राम मेकले, भीमराव पाटील,नंदू बनसोड, सुनील कुबल यांच्यासह राज्य व कोकण विभागातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.विचारमंथन, संवाद व दिशा देणारी सत्रे पहिल्या दिवशी सार्वजनिक ग्रंथालयांची आत्मनिर्भरता, संगणकीकरण, तसेच अनुदानाव्यतिरिक्त उत्पन्नाची साधने वाढविणे या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन होणार आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, कोकण विभाग ग्रंथालय संघ व रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या सर्वसाधारण सभा, कार्यकारी व नियामक मंडळाच्या सभा पार पडणार आहेत.दुसऱ्या दिवशी रत्नागिरीतील शताब्दी ग्रंथालयांवर परिसंवाद, तसेच ग्रंथालय चळवळीचा मुळाधार असलेल्या ग्रंथालय सेवकांवर विशेष सत्र होणार असून शेवटी खुले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या खुल्या अधिवेशनातून ग्रंथालय चळवळीच्या भविष्यासाठी नवे विचार, संकल्पना व दिशा मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.या महत्त्वपूर्ण अधिवेशनाचे आयोजन रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ व आमदार स्व. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री दिलीप कोरे, कार्याध्यक्ष श्री रामदास गायकवाड, प्रमुख कार्यवाह श्री प्रकाश पाटील, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री श्रीकृष्ण साबणे, प्रमुख कार्यवाह महेंद्र दळवी, कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील, संचालक श्री विश्वनाथ बापट, राज्य संचालक रवींद्र कालेकर, तसेच राकेश अंबेरकर, विजय कालेकर, गजानन जोशी, रोशनी सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.ग्रंथालय चळवळीला नवी ऊर्जा देणारे हे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी ग्रंथालय सेवक, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













