बोरी नाक्यावर मोकाट जनावरामुळे अपघात; राम रतन हॉटेलच्या मालकाचा मृत्यू
प्रतिनिधी अमुलकुमार जैन
रायगड / उरण :- (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि. २५ उरणमधील प्रसिद्ध राम रतन हॉटेलचे मालक महेंद्र सहतिया यांचा बोरी नाका येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. सोमवारी (२४ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे उरण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, द्रोणागिरी-मोरा मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र सहतिया हे पत्नीसमवेत स्कुटीवरून द्रोणागिरीहून मोराच्या दिशेने जात होते. बोरी नाका परिसरात रस्त्यावर आलेल्या मोकाट जनावराला स्कुटीची धडक बसली. या अपघातात सहतिया दाम्पत्य गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ
त्यांना इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच महेंद्र सहतिया यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उरण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ७५/२०२६ दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी द्रोणागिरी-मोरा मार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या मार्गावर यापूर्वीही अपघात झाले असून, सुमारे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या एका अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.रात्रीच्या वेळी रस्त्यावर अपुरा प्रकाश असल्याने वाहनचालकांना रस्त्यावरील अडथळे आणि मोकाट जनावरे दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग नियंत्रणात राहत नाही. द्रोणागिरी-मोरा मार्गावर रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे रस्त्यावर बसत असल्याच्या तक्रारीही वारंवार करण्यात आल्या आहेत.अपघातप्रवण ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव असल्याने घटनांचे निरीक्षण आणि कारणांचा तपास करण्यात अडचणी येतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उरण नगरपालिका आणि संबंधित विभागाने तातडीने पथदिवे सुरू करावेत, आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवावेत, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













