एसटीच्या सवलतीच्या प्रवासाला दिलासा; NCMC कार्डसाठी मुदतवाढ कार्ड न मिळालेल्या महिला, ज्येष्ठांना नोंदणी पावतीवर प्रवासाची मुभा; गणेशोत्सवातील ग्रुप बुकिंगलाही सक्ती नाही
प्रतिनिधी अमुलकुमार जैन
रायगड (आलिबाग) :– राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयात महामंडळाने काही बदल केले आहेत. कार्ड प्रणाली सुरू करताना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.ज्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी NCMC कार्डसाठी नोंदणी केली आहे, मात्र त्यांना अद्याप कार्ड मिळालेले नाही, अशा प्रवाशांना नोंदणीची पावती दाखवून सवलतीच्या मॅन्युअल तिकिटावर प्रवास करता येणार आहे. ही सुविधा ३० सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे.ऑनलाइन तिकीट आरक्षित केलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही विशेष बाब म्हणून NCMC कार्डची सक्ती करण्यात येणार नाही. त्यांना आरक्षित तिकिटावर पूर्वीप्रमाणे सवलतीच्या
दरात प्रवास करता येणार आहे.गणेशोत्सवासाठी करण्यात आलेल्या किंवा करण्यात येणाऱ्या ग्रुप बुकिंगमध्ये सहभागी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही NCMC कार्डची सक्ती केली जाणार नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात गावाकडे जाणाऱ्या सवलतधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.दरम्यान, ज्या लाभार्थ्यांकडे Active NCMC Card आहे, त्यांना सवलतीचे तिकीट त्याच कार्डच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.१ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य केल्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी या प्रणालीवर आले. त्यामुळे सर्व्हरवरील भार वाढल्याने तिकीट काढताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. याबाबत प्रवाशांच्या तक्रारी महामंडळाकडे प्राप्त झाल्या.या पार्श्वभूमीवर सवलतधारक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मॅन्युअल तिकिटावर प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या काळात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













