जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त जीवन धारा संस्थेची जनजागृती रॅली आणि सत्राचे आयोजन
प्रतिनिधी अभिनव येवले
मुंबई : दि.१३ बालमजुरीच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधत जागतिक बाल कामगार विरोधी दिना (१२ जून १२२५) च्या निमित्ताने जीवन धारा संस्था व क्राय संस्थेच्या सहकार्याने मानखुर्द परिसरातील चिता कॅम्प व साठे नगर या भागात भव्य जनजागृती रॅली व सत्राचे आयोजन करण्यात आले.मुंबईसारख्या महानगरात बालमजुरीचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन जीवन धारा संस्थेने या मोहिमेची सुरुवात केली आहे. शिक्षणापासून दूर पडलेली व कामाला लावली गेलेली हजारो बालके या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित करतात.चिता कॅम्प येथे काढण्यात आलेल्या रॅलीत स्थानिक मुले, पालक, शिक्षक, जीवन धारा संस्थेचे कर्मचारी तसेच ट्रॉम्बे पोलिस स्टेशनचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीमध्ये “बालमजुरी बंद करा”, “शिक्षण हक्क आहे, मजुरी नव्हे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी पोलिस अधिकारी व
सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थितांना बालकामगार कायद्यासंबंधी माहिती व मार्गदर्शन दिले.साठे नगर भागात “बाल कामगार बंद करा” या आशयाचे स्टिकर्स व पोस्टर्स स्थानिक भागात लावण्यात आले, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सजगता निर्माण झाली.या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे जीवन धारा संस्थेचे प्रकल्प अधिकारी अभिनव येलवे यांनी घेतलेले सत्र. त्यांनी “बालमजूर कोणाला म्हणायचे?” आणि “बालकामगार कायदा” या विषयांवर मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. त्यांच्या सत्रामुळे मुलांमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि आपल्या हक्कांबाबत त्यांनी विचार करायला सुरुवात केली.जीवन धारा व क्राय संस्था यांचे हे संयुक्त पाऊल समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रभावी प्रयत्न ठरले असून, भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून बालमजुरीविरुद्धचा लढा अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्यात येईल.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













