मुंबई महानगराचा विकास: निती आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांना सादर
प्रतिनिधी
मुंबई :- दि.२२.निती आयोगाने मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) आणि परिसराच्या विकासावर आधारित एक महत्त्वपूर्ण अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला आहे. या अहवालात मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) पाच वर्षांत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी निती आयोगाने सात प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि निती आयोगाचे मुख्य 
कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.निती आयोगाच्या अहवालानुसार, सध्या एमएमआरचा जीडीपी १२ लाख कोटी (१४० बिलियन डॉलर) आहे. हे आकडे २०३० पर्यंत २६ लाख कोटी (३०० बिलियन डॉलर) करण्याचे लक्ष्य आहे. अहवालात, शहरातील रोजगार निर्मितीवर भर दिला असून, १ कोटी विद्यमान रोजगारांमध्ये आणखी ३० लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील परवडणारी घरे, डेटा सेंटरचा विकास, आणि अलिबाग मल्टीमोडल कॉरीडोअरच्या उभारणीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, नुकतेच महाराष्ट्रातील ८० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे राज्याचा विकास वेगाने होण्याची अपेक्षा आहे.निती आयोगाच्या अहवालानुसार मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासासाठी एकात्मिक योजना आखण्यात आली असून, विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून आर्थिक वृद्धीला चालना देण्यात येणार आहे. या उपक्रमांमुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्र म्हणून महत्त्व वाढणार आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













