सर्वे येथील शिवमंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली

रायगड (मुरुड) :- मुरुड तालुक्यातील प्राचीन पांडवकालीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या काशिद ग्रामपंचायत हद्दीत सर्वे येथील कावड्याच्या डोंगरावर वसलेल्या सर्वेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली. यादिवशी सकाळी शिवपिंडीची विधिवत पूजा-अर्चा, आरती करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रम 
तसेच श्री शिवलीलामृत ग्रंथ वाचन, भाविकांसाठी सुश्राव्य बहारदार भजन घेण्यात आले. निसर्गरम्य परिसरात अथांग समद्रकिनारा लाभलेल्या कावड्याच्या डोंगरावरील प्रसिद्ध शिवमंदिरात मुंबई, पुणे यांसह जिल्ह्यातील, तालुक्यातील व परिसरातील शिवभक्तांनी शिवपिंडीचे दर्शन घेऊन पूजाअर्चा करून महाप्रसादाचा लाभ घेतला.
मुरुड तहसीलदार कार्यालयाचे महसूल नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, पोलिस निरीक्षक प्रकाश सकपाळ, नांदगाव तलाठी देशमुख आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वे ग्रामस्थ व महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले. काशिद बीच पर्यटनात सर्वे येथील ऐतिहासिक पांडवकालीन डोंगरावर कावड्याच्या असलेल्या शिवमंदिराला अनन्य साधारण महत्व असून याठिकाणी पर्यटक व भाविकांसाठी वीज, पाणी, रस्ता इतर सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी दानशूर भाविकांनी आपले योगदान द्यावे तसेच शासनाने याठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे. पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे श्री सर्वेश्वर मंदिर तालुक्यातील सर्वे येथील डोंगरावर निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेले हे देवस्थान धार्मिक पर्यटक स्थळ म्हणून नावारूपाला येत आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला सर्वे गावच्या वतीने येथे उत्सव आयोजित केला जातो. या देवस्थानच्या रस्ता, पाणी, वीज इतरही समस्यांकडे सामाजिक सेवा संस्था यांनी लक्ष देवून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तर हे देवस्थान महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक पर्यटक स्थळ होईल व येथील स्थानिकांना रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होईल, असे काशिद ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुशील खोपकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













