जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रिमोट ऑपरेटेड लाईफ बोया उपलब्ध
पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते वितरण
रायगड / अलिबाग :- ( आ. मा. टॉ. टे. न्यु.) दि. १२ रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून रिमोट ऑपरेटेड लाईफ बोया उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बचाव उपकरणांचे वितरण पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक 
आंचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्यासह संबंधित नगरपरिषद व ग्रामपंचायतींचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.समुद्रात बुडण्याच्या किंवा पाण्यात अडचणीत सापडलेल्या पर्यटकांना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी रिमोट ऑपरेटेड लाईफ बोया हे उपकरण उपयुक्त ठरते. हे उपकरण रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने पाण्यातील संकटग्रस्त व्यक्तीपर्यंत पोहोचविता येते. त्यामुळे बचावकार्य अधिक जलद करण्यास आणि जीवरक्षकांच्या सुरक्षिततेस मदत होऊ शकते.समुद्रकिनाऱ्यांवरील बचाव यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही उपकरणे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात आली आहेत. अलिबाग, मुरुड व श्रीवर्धन नगरपरिषदा तसेच नागाव, काशीद, हरिहरेश्वर आणि दिवेआगर येथील ग्रामपंचायतींना या उपकरणांचे वाटप करण्यात आले. काशीद येथे दोन उपकरणे देण्यात आली आहेत.उपकरणांचे वितरण केल्यानंतर अलिबाग समुद्रकिनारी जीवरक्षकांसाठी रिमोट ऑपरेटेड लाईफ बोया वापरण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाद्वारे उपकरणाचे संचालन, समुद्रातील संकटग्रस्त व्यक्तीपर्यंत ते पोहोचविण्याची पद्धत आणि बचावकार्यादरम्यान त्याचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आधुनिक बचाव उपकरणांचा वापर, प्रशिक्षित जीवरक्षकांची उपलब्धता आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













