ताम्हिणी घाटातील महिलेच्या हत्येचा छडा; दोन आरोपी २४ तासांत जेरबंद
प्रतिनिधी अमुलकुमार जैन
रायगड ( माणगाव ) :- (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि.२८ ताम्हिणी घाटातील दरीत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. महिलेची ओळख पटवून तिच्या हत्येप्रकरणी दोन संशयित आरोपींना अवघ्या २४ तासांत ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे ताम्हिणी घाटातील या हत्येचे गूढ उलगडले आहे.२५ ऑगस्ट रोजी दुपारी माणगाव पोलिसांना ताम्हिणी घाट परिसरातील मोजे कोंढेधर गावाच्या हद्दीत पुणे-माणगाव रस्त्यालगत असलेल्या दरीत २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आला होता. महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर तपासातून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याने २६ ऑगस्ट रोजी माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचे गांभीर्य
लक्षात घेऊन रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी तांत्रिक तपासासह उपलब्ध माहितीच्या आधारे महिलेची ओळख पटविण्यास सुरुवात केली.तपासादरम्यान मृत महिला ही सुमन गोपाळ यादव, रा. चिखली, पुणे, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुर्गाप्रसाद मंगलप्रसाद प्रजापती (२४) आणि दिनेशकुमार बिसराम प्रजापती (२७), दोघेही चिखली, पुणे येथील रहिवासी, यांच्यावर संशय घेतला.पोलिसांनी संशयितांच्या ठावठिकाणाबाबत माहिती मिळवून त्यांना पिंपरी-चिंचवड परिसरातून तपासासाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी महिलेला फिरण्याच्या बहाण्याने ताम्हिणी घाटात नेले. तेथे ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह घाटातील दरीत फेकून दिल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.दोन्ही संशयित आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास माणगाव पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













