निविदा की नाटक? रोह्यात निविदा प्रसिद्धीच्या दिवशीच काम सुरू – एमआयडीसीवर संशयाची सावली
प्रतिनिधी
रायगड (रोहा ) :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) रोहा शहरातील पावसाळी पाण्याच्या निचऱ्याचे काम करण्यासाठी काढलेली निविदा ही केवळ औपचारिकता होती का? निविदा जाहीर झाल्याच्या त्याच दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने, प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.६ जून २०२५ रोजी एमआयडीसीने ई-निविदा क्रमांक १६/२०२५-२०२६ अंतर्गत मस्जिदजवळील बायपास रस्त्यावर जुन्या लहान बॉक्स कल्व्हर्टच्या जागी आरसीसी बॉक्स कल्व्हर्ट बांधण्याच्या कामासाठी निविदा जाहीर केली. या कामाची एकूण अंदाजित किंमत सुमारे ₹३९ लाख इतकी आहे. मात्र, या निविदेची जाहिरात प्रसिद्ध होताच त्या दिवशीच काम सुरू झाल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळाले.

कायदाच काय, शासकीय नियमही पायदळी?
शासनाच्या नियमांनुसार कोणतेही शासकीय काम निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सुरू करता येत नाही. यामध्ये प्रस्ताव सादरीकरण, तांत्रिक व आर्थिक चाचणी, ठेकेदाराची निवड, काम आदेश, आणि शेवटी काम सुरूवात हे टप्पे अनिवार्य आहेत. परंतु रोह्यात हे सगळे नियम झुगारून देण्यात आले की काय, अशी शंका जनतेतून व्यक्त होत आहे.
आधीपासून ठरलेली ‘सेटिंग’?
काम सुरू झाले तेव्हा निविदेचे दस्तऐवज अद्याप उपलब्ध होते. यावरून स्पष्ट होते की हा व्यवहार आधीच ‘सेट’ करण्यात आला होता. अशा प्रकारचा उघड उघड गैरप्रकार म्हणजे शासकीय धनाचा अपवापर आणि निविदा प्रक्रियेची थट्टा आहे, असे स्थानिक जनतेत चर्चा आहे.
जबाबदार कोण?
या प्रकारात संबंधित कार्यकारी अभियंता, परियोजना अधिकारी, तसेच निविदा समितीचे सदस्य यांची चौकशी होणे गरजेचे आहे. जनतेचे पैसे आणि विकास कामात प्रामाणिकपणा आवश्यक असताना, असे प्रकार प्रशासनातील भ्रष्ट व निष्काळजी वृत्तीचे उदाहरण ठरतात.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













