राष्ट्रीय आदर्शच्या निसर्गदुतांचे टीटीसी नागपूरद्वारा कौतुक
सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी
नागपुर (रामटेक) :- राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी ही पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम भागात धरणाच्या लगत असलेली ग्रामीण भागातील शाळा. येथे पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे पेंच व्याघ्र प्रकल्पातील (पश्चिम) बफर झोनमध्ये राहतात. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे तत्कालीन सहसंचालक मा. संजय करकरे यांचे मार्गदर्शनाखाली २००५ पासून पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी शाळेची निवड करून शाळेचे शिक्षक साक्षोधन कडबे यांनी संस्थेचे अध्यक्ष मा. आनंदराव देशमुख साहेब आणि सचिव मा. मयंकराव देशमुख साहेब यांचे 
मार्गदर्शनाखाली शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून गाव खेड्यातल्या मुलांवर पर्यावरणीय संस्कार करण्यास सुरुवात केली. “निसर्ग आणि माणूस यांचे नाते अतूट आहे. “निसर्ग आपल्याला जे जे लागतं ते ते भरभरून देतो, मग माणूस म्हणून निसर्गाला आपलंही काही देणं लागतं” हा विचार विविध कृतिशील उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात रुजू लागला. महाराष्ट्र शासनाने देखील शाळेद्वारा राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणीय उपक्रमांची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार-२०१९ प्रदान करून शाळेचा गौरव केलेला आहे. यापूर्वी वनविभाग द्वारा शाळेला विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हे येथे उल्लेखनीय. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा वनाशी आणि वन्यजीवांशी मनापासून जोडला गेला. त्यामुळे जिथे कुठे एखादा पक्षी, प्राणी किंवा वन्यजीव जखमी अवस्थेत सापडला असेल त्याला वाचवण्याचे प्रयत्न विद्यार्थी संवेदनशीलपणे करतात. त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतात. खऱ्या अर्थाने निसर्ग आणि माणूस यांच्यातील अतूट नाते कृतिशीलतेतून जपले जात आहे. शाळेच्या या प्रयत्नांना वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे मोठे सहकार्य लाभते. सद्यस्थितीत बनयान ट्री फाउंडेशन द्वारा उपसंचालक मा. संजय करकरे यांचे मार्गदर्शनाखाली ‘वन आणि वनातील उपज’ या विषयावर सर्वेक्षण प्रकल्प राबविण्यात येत आहे.
नुकतेच ४ एप्रिलला निसर्गदूत कुणाल कोकोडेला सापडलेले पक्षाचे पिल्लू वाचविण्यासाठी योग्य आहार व उपचार याबद्दल व्हिडिओ कॉलद्वारा मा. कुंदन हाते सरांनी माहिती दिली. ते पिल्लू सुगरणीचे नसून ‘जांभळा सूर्यपक्षी’ आहे अशी खातरजमा ओळख मा. करकरे सरांनी केली. ६ एप्रिलला टीटीसी, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे ‘उन्हाळ्यात जखमी वन्यजीवांवर उपचार व काळजी’ या विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी टीटीसीचे समन्वयक मा. कुंदन हाते यांनी राष्ट्रीय आदर्शच्या निसर्गदुतांनी ‘सनबर्डला वाचविण्यासाठी तयार केलेले कृत्रिम घरटे, दिलेला योग्य आहार आणि घेतलेली उत्तम काळजी’ याची शहानिशा केल्यावर उपस्थित पक्षीप्रेमींच्या समक्ष निसर्गदुतांचे भरभरून कौतुक केले. डॉ. पंकज थोरात, डॉ. राजेश फुलसुंगे, डॉ सुदर्शन काकडे यांनी टीटीसी सेंटरमध्ये जखमी वन्यजीवांची घेतली जाणारी काळजी व उपचार याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. जैन इम्पॉवरमेंट ऑर्गनायझेशन नागपूर या सेवाभावी संस्थेकडून मुलांना पक्षांसाठी जलपात्र भेट देण्यात आले. शाळेचे शिक्षक साक्षोधन कडबे यांनी २००५पासून शाळेत पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली तसेच या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी मा. कुंदन हाटे व मा. संजय करकरे सर यांचे मनस्वी आभार मानले. याप्रसंगी एम्सचे डॉ. सुयोग रत्नपारखी, प्रमोद भागवतकर, बहुसंख्य वन्यजीव प्रेमी व अभ्यासक प्रामुख्याने उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













