खेडमध्ये शंभर रुपयांचे मुद्रांक उपलब्धच नाहीत
पत्रकार राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड) :- खेड तालुक्यात सध्या मे महिन्याच्या सुट्टीमुळे गावी घर बांधणे किंवा शासकीय दस्तऐवज करण्यासाठी प्रतिज्ञापत्र करण्यासाठी शंभर रुपयांचे मुद्रांक सर्रास वापरले जात असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून खेडमध्ये अचानकपणे शंभर रुपयांच्या मुद्रांकांची उपलब्धता असतानाही आणि पाच रुपयांच्या तिकिटांची कृत्रिम टंचाई निर्माण करून त्याच्या बदल्यात नागरिकांना पाचशे रुपयांचे मुद्रांकाची विक्री केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून याबाबत चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मे महिन्याच्या सुट्टीच्या हंगामात कोकणात आलेले चाकरमानी सध्या विविध शालेय दाखले आणि घरकुल संबंधी प्रतिज्ञापत्र करण्यासाठी खेड तहसीलदार कार्यालयात येताना दिसत आहेत. मात्र प्रतिज्ञापत्र करण्यासाठी लागणारे शंभर रुपयांचे मुद्रांकाची टंचाई निर्माण झाली असल्याचे मुद्रांक विक्रेत्यांकडून सांगण्यात येते यामुळे नागरिकांना प्रतिज्ञापत्र करण्यासाठी अडचणी येत आहेत. वेळेची गरज लक्षात घेऊन काहीजण शंभर ऐवजी पाचशे रुपयांचे मुद्रांकाची विक्री प्रतिज्ञापत्र करण्यासाठी करत आहेत. तर काहि ठिकानी या कृत्रीम टंचाईच्या नावाखाली शंभर रुपयांच्या मुद्रांकाची १२० ते १५० रुपयांना विक्री करत असल्याच्या तक्रारी तहसीलदार आणि दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाकडे येत आहेत.
खेड शहरात केवळ चार जण अधिकृत मुद्रांक विक्रेते आहेत. तर १५ ते २० जण हे बॉण्ड रायटर आहेत. अशातच मुद्रांकाची कृत्रिम टंचाई करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात येत असून, याबाबत येथील तहसीलदार कार्यालयातील ट्रेझरी मध्ये संपर्क साधला असता ट्रेझरीमध्ये शंभर रुपयांचे ४५ हजार मुद्रांक उपलब्ध आहेत. तर पाच रुपयांच्या स्टॅम्प तिकिटांची छपाईच झाली नसल्याची माहिती देण्यात आली.
मुद्रांक उपलब्ध असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून नागरिकांना आर्थिक भुर्दंड दिला जात असल्याबाबत येथील सहयायक निबंधक श्री. राजेंद्र फाटक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात उपलब्ध होऊ शकले नाहीत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













