४२ लाखाच्या झापोळे तलावाच्या कामात अनियिमता, भ्रष्टाचारी धोरण अवलंबल्याबाबत पाली नगरपंचायत मुख्याधिकारी, नगर पंचायत अभियंता यांना तत्काळ निलंबित करा – भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
प्रतिनिधि सुधागड
जिल्हाधिकारी रायगड यांना सुधागड पाली तहसीलदार तर्फे निवेदन सादर
रायगड (सुधागड) :- सुधागड तालुक्यातील पाली देऊळवाडा येथील ४२ लाखाच्या झापोळे तलावाच्या कामात अनियिमता, भ्रष्टाचारी धोरण अवलंबल्याबाबत पाली नगरपंचायत मुख्याधिकारी विद्या येरूणकर, नगर पंचायत अभियंता देवेंद्र मोरकंडीकर यांना तत्काळ निलंबित करा व या अधिकारी वर्गावर विभागीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्याकडून जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे दिनांक ११ मे रोजी जिल्हाधिकारी रायगड यांना सुधागड पाली तहसीलदार तर्फे निवेदन सादर करण्यात येऊन केली.
जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करताना पाली तहसीलदार मार्फत देण्यात आले. हे निवेदन महसूल नायब तहसिलदार वैशाली काकडे यांच्याकडे सादर केले. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत हिंगणे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंगेश यादव, सुधागड तालुका अध्यक्ष संदीप सिलिमकर, सुधागड तालुका सचिव अक्षय परमार, सुधागड तालुका दिलीप निगुडसे आदि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
रायगड जिल्हा नियोजन समितीकडून पाली नगरपंचायत हद्दीतील वरचा देऊळवाडा व खालचा देऊळवाडा समोरील तळ्याभोवती सुशोभीकरण व उद्यान तयार करणे यासाठी प्रशासकीय मान्यतेने ४२ लाखाचा निधी मंजूर झाल्याचे पत्र महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारी यांनी ३१ मार्च २०२२ रोजी काढले होते. पाली नगरपंचायतीकडून या तलावाच्या कामाबाबत आपल्या मर्जीतील ठेकेदारकडून मे २०२२ ते जून २०२२ मध्ये या तलावाचे अर्धे काम करण्यात आले. परंतु याची निविदा दि.१३ जुलै २०२२ रोजी वृत्तपत्रात देण्यात आली. १६ सप्टेंबर २०२२ रोजी निविदा उघडून स्थायी समितीकडे मंजूर करण्यासाठी पाठवण्यात आली. नगरपंचायतीच्या मर्जीतील ठेकेदारालाच निविदा कशी मंजूर होईल याची पुरेपूर काळजी नगरपंचायतीकडून घेण्यात आली होती.
शासकीय विकास कामे निविदा न काढता आधी करायचे आणि नंतर निविदा काढायची हा पाली नगर पंचायतीचा एक गजबच प्रकार दिसून आला आहे. आणि मर्जीतील ठेकेदारालाच काम कसे मिळेल निविदेत याची सोय करायची. या सर्व बाबीमुळे शासकीय विकास कामे राबवताना कामातील अनियमित्ता, पारदर्शकता धोरण न अवलंबणे, भ्रष्टाचाराला पाठपुरावा करणे यासाठी शासनाचे नगर पंचायतीचे जबाबदार अधिकारी म्हणून नगरपंचायत मुख्याधिकारी व नगरपंचायत अभियंता यांची सर्वस्वी ही जबाबदारी होती. त्यामुळेच सुधागड तालुक्यातील पत्रकार तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत हिंगणे यांनी माहिती अधिकारतून ती माहिती मिळवून जिल्हाधिकाऱ्यांना पाली नगर पंचायत मुख्याधिकारी, पाली नगर पंचायत अभियंता यांना तात्काळ निलंबित करा व विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्याकडून करण्यात आली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













