छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य शिवजन्मोत्सव पंधरवड्याचा मनपा शाळा क्रमांक ४५ येथे समारोप!
प्रतिनिधी
ठाणे :- दि. १९ अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवजन्मोत्सव पंधरवड्याच्या समारोपप्रसंगी भिवंडी महानगरपालिका शाळा क्रमांक ४५, संपदा नाईक हॉल येथे विविध स्पर्धांतील सहभागी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रशासनाधिकारी भिवंडी मनपा श्री. शिखरे, उद्योजक श्री. प्रदीप करसन तरे (उद्योजक -महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन), डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील (संपादक दैनिक स्वराज तोरण), श्री. दिलीप नाईक (एस.के.एन. ब्रदर्स), कु. अनन्या म्हात्रे (युवावक्ता), कु. छायांक म्हात्रे (युवानेता), श्री. राम पाटील (संस्था संचालक), श्री. सुनील 
दांडेकर (शिक्षक), श्री. अवी मोरे, श्री. मनोज दिवेकर, ॲड. संदीप तरे तसेच ‘आऊ साहेबांची सावली’ संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालकवर्ग व भादवड-टेमघरपाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शिवगर्जनेच्या स्वरात करण्यात आली. डॉ. किशोर बळीराम पाटील संपादक-दैनिक स्वराज्य तोरण व श्री. प्रदीप तरे (उद्योजक -महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन)यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व ग्रंथपुस्तिका देऊन स्वागत करण्यात आले.समूहगीत व समूहनृत्याच्या सादरीकरणानंतर विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना ‘आऊ साहेबांची सावली’ संस्थेतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.याच प्रसंगी संस्थेकडून इयत्ता तिसरीतील कु. रोहिणी राजेंद्र चव्हाण हिची पुढील शैक्षणिक जबाबदारी स्वीकारण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र तेलवणे, सदस्य अविनाश घोडके व श्रीमती तेलवणे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. तसेच उद्योजक श्री. प्रदीप करसन तरे यांनी संबंधित विद्यार्थिनीसाठी २५ हजार रुपयांची मुदत ठेव (एफ.डी.) जाहीर करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.प्रशासनाधिकारी श्री. शिखरे यांनी आपल्या मनोगतात भिवंडी महानगरपालिका शाळा क्रमांक ४५ ही पालिकेतील अव्वल शाळांपैकी एक असून येथील शिक्षक विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करतात, असे सांगत मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा समिती व ग्रामस्थांचे कौतुक केले. तर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त डॉ. किशोर पाटील यांनी शाळेने सुरू केलेला शिवजन्मोत्सव पंधरवडा हा केवळ भिवंडीतच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आगळावेगळा उपक्रम असल्याचे नमूद केले.कार्यक्रमात ‘शिवरायांची आग्रा भेट’ या विषयावर श्री. हिंदुराव यांनी व्याख्यान दिले. प्रास्ताविक श्री. सदानंद म्हात्रे यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ. स्वाती भोईर यांनी प्रभावीपणे पार पाडले. मुख्याध्यापक श्री. धुमाळ यांनी आभार प्रदर्शन केले.शेवटी श्री. प्रदीप तरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शिवराजमुद्रेच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता होत शिवजन्मोत्सव पंधरवड्याचा उत्साहपूर्ण समारोप करण्यात आला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













