जय जवान गोविंदा पथक कबड्डी संघ ते थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव
पत्रकार शुभम पेडामकर,
मुंबई :-एक असा सण ज्याकडे आज साहसी खेळ म्हणून पाहिले जाते आणि आता विविध ठिकाणी त्याच्या स्पर्धाही भरवल्या जातात. गणपती बाप्पा मोरया, बोल बजरंग बली की जय, जागेवाले की जय, जोगेश्वरी माते की जय, जो बोले सोनेहाल सत्सश्री आकाल या घोषणा, आणि मी स्कॉट द्यायला आहे, मी दोनच्या शिडीला आहे, मी तीनच्या शिडीला आहे, मी टीबल एक्क्याला हात द्यायला आहे, मी दुसऱ्या थरावर आहे, आम्ही कडक सात लावून उतरवतो अशी चर्चा तरुणाईमध्ये गल्लोगल्ली पहायला मिळते. नक्किच तुम्हाला कळाल असेलच की, मी दहीहंडी या सणाबद्दल बोलतो आहे ते. ज्यामध्ये अनेक लोक कोणताही आर्थिक उद्देश न ठेवता एकत्र येऊन एकमेकाला हाथ देत अंगा-खांद्यावरून चढाई करत एकमेकांच्या विश्वासावर शरीरातील बळ एकवटून धीटपणे मानवी मनोरे रचून दोरखंडात अडकवलेली हंडी फोडतात. ज्याच्या सरावाची सुरवात मुंबईतील तमाम बाळगोपाळ गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आरंभीत करतात. महाराष्ट्रात याची वेगळीच ओळख आहे आणि मुंबईतील जोगेश्वरी विभागात याचे एक वेगळेच आकर्षण आहे.

सध्याच्या परिस्थितीत अनेक गोविंदा पथक टिकून राहण्यासाठी धडपड करत असतात, परंतु जोगेश्वरीतील एक गोविंदा पथक असे आहे जे गेल्या तेवीस वर्षांपासून एकनिष्ठेने स्वतःचे सातत्य टिकवून आहेत, ते म्हणजे जय जवान गोविंदा पथक. ज्यांना “उपनगरचा राजा” असेही म्हटले जाते. खर तर याची सुरवात १९७५ साली कबड्डीच्या माध्यमातून एका मंडळाच्या स्थापनेने झाली ज्याचे मुळात नाव “जय जवान” असे ठेवण्यात आले होते. या मंडळातून मैदान, मंदिर, व्यायाम शाळा व लोकांमधील एकी टिकून ठेवण्यासाठी झाली होती. काही मुले नित्त्य नियमितपणे रोज यायचे कबड्डी खेळून मैदानाची माती अंगाला लावून घरी जायचे. एकदा असेच त्यांच्यातील एक व्यक्ती पुढे आली व त्याने “जय जवान गोविंदा पथक” स्थापन केले. त्या व्यक्तीच नाव होत जोगेश्वरी-शिवटेकडीमधील उत्कृष्ट कबड्डीपटू “संदीप ढवळे”. त्या विभागात येणाऱ्या मुंबईतील गोविंदा पथकांना पाच थर, सहा थर लावताना पाहून त्यांच्या मनात एक वेगळी ऊर्जा, भावना निर्माण झाली व त्यांनाही वाटू लागले की आपलेही एक गोविंदा पथक असावे. २००० साली फक्त पंधरा कबड्डीपटू हाताशी घेऊन पथकाची सुरवात झाली. सुरवातीच्या काळी अस काही ठरल नव्हते की आपल्याला आठ ते नऊ थरापर्यंत उंची गाठायची आहे, परंतु मनात एक श्रद्धास्थान होत ते म्हणजे सण हा सणासारखा साजरा करावा आणि आपली हिंदू संस्कृती टिकून रहावी तसेच आपल्या जोगेश्वरी विभागाचे नाव लोकांना लक्षात राहील. सुरवात ही पाच थरांनी झाली परंतु थर कोसळले तर त्यांना पकडायला लोक कमी पडायचे म्हणजे तस कोणी नसायचे. रोज प्रॅक्टिस करत राहून दोन एक्क्यांनी पाच थर लावु लागले. पथक नवीन त्यामुळे स्पॉन्सरशिपही समोरून कोणी द्यायचे नाही. अस्तरच्या कपड्याच्या टी-शर्टवर मंडळाच नाव लिहून पहिल्यांदा पहिला हा आनंद त्यावेळी काही औरच होता. यानंतर दुसरा आनंद तर त्याहुन मोठा होता ज्यावेळी सहा थर लावून हंडी फोडण्यात आली होती त्यासाठी पथकाला ५१ रुपया देण्यात आले होते आणि हा आनंद आजतागायत अविस्मरणीय क्षण बनून राहिला आहे. त्यादिवशी सात ते आठ हंडीवर स्वतःचे नाव कोरले. त्याची रक्कम ५१, २५१, ५०१ अशी मिळत गेली. पुढच्या वर्षी म्हणजे वर्ष होत २००१ उत्साह वाढला होता. सात थर लावायचे ठरले परंतु ते वर्ष भूकंपासारखे गेले. एकाही जागी थर उभे राहू शकले नाही. खूप सारे गोविंदा मुक्या माराने किरकोळ जखमी झाले. पण हिम्मत नाही हारली. २००२ त्या वर्षी जय जवान पथकाने सात थरांनी २४ हंड्या फोडल्या. २००३ साली अशीच घौडदौड कायम राखत. २००४ साली प्रथमच आठ थरांची सलामी दिली. २००४, २००५, २००६, २००७अशी लागोपाठ चार वर्षे आठ थर लावले. वर्षागणिक अशी उंची गाठत मेहनतीचे फळ चाखत जय जवान गोविंदा पथकाचा प्रवास सुरु झाला. २००८ साली प्रथमच ९ थरांची सलामी दिली. ९ थर लावणारे गोविंदा पथक म्हणून सगळीकडे चर्चा होऊ लागली. २००९ साली स्वाईन फ्लूच्या फैलावामुळे दहीहंडी होऊ शकली नाही. २०१० साली दहा थरांचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु तो सफल होऊ शकला नाही, पण काही ठिकाणी नऊ थर लावण्यात यश आले, २०११ लाही नऊ थरांचे सातत्य टिकवण्यात यश आले. नंतर आले २०१२ हे वर्ष जय जवान गोविंदा पथकाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जावे असे गेले. या वर्षी एक विश्वविक्रमी नऊ थर लावून शिस्तबद्ध उतरवून सर्वात उंच मानवी मनोरा म्हणून जय जवान पथकाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदण्यात आले. २०१५ साली चार वेळा नऊ थर लावून उतरवले. हे पुढे असेच २०१६, २०१७, २०१८, २०१९ या वर्षात स्वतःचे नऊ थरांचे सातत्य टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. तसेच जय जवान पथकाची कीर्ती ही भारतात नसून तर ती आज साता-समुद्रापार पोहचली आहे. स्पेनसारख्या देशात मानवी मनोरे रचत तिरंगा फडकवण्यात आला आहे. गोविंदाचा जल्लोष वाढवा म्हणून जय जवान या नावाने थीम सॉंगही बनवन्यात आले आहे. घरातील विरोध, उंच थर लावू नये अशी बंदी, कोर्ट-कचेरुतून आलेल्या नोटीस अश्या अनेक अडथळ्यांना पार करत जय जवान या पथकाने स्वतःचे नाव वेगळ्या उंचीवर पोहचले आहे. सात थर लावण्यासाठी पथकांच्या रांगेत उभे राहणारे आज जय जवान पथक हंडी फोडायला येत आहे असे समजले की चहू बाजूला लोकांची गर्दी होते. शे-दोनशे रुपयांच्या बक्षिसाने सुरवात करून आज लाखोंच्या बक्षिसांवर नावे कोरली आहेत. दोन पाव आणि मिसळवर दहीहंडीचा दिवस काढणाऱ्या पथकातील गोविंदाना आज पुलाव, वडा उसळ देत चांगल्याप्रकारे ट्रीट केल जात आहे. फक्त स्थानिक पंधरा गोविंदावर सुरू झालेल पथक आज विशाल समुदायात व्यपलेला आहे. मुंबईतील निरनिराळ्या विभागातून लोक येतात अगदी टिटवाळा, वसई-विरारहुन स्वतःच घर, कुटूंब, ऑफिस सांभाळत प्रॅक्टिसच्या ठरलेल्या वेळेत उपस्थित राहतात. आज सर्व गोविंदा एखाद्या कुटूंबाप्रमाणे-भावंडाप्रमाणे राहतात. सर्वांच्या सुख-दुःखात धावून जातात, कोणाला आर्थिक नड असेल तर त्याला मदत करतात. प्रत्येक गोविंदाचा एक जबाबदारी म्हणून विमादेखील उतरवलेला आहे. २६ जुलैला निर्माण झालेल्या पूरस्थितीत जोगेश्वरीत साफ-सफाईचे व जेवण वाटपाचे एकत्रित येऊन योगदान दिले होते. तसेच रक्तदान, आदिवासी पाड्यात धान्यवाटप, नैसर्गिक आपत्ती आल्यावर केली जाणारी साफ सफाई व इतर असे निरनिराळे उपक्रम पथकाच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. एकेकाळी स्पॉन्सरशिपसाठी धडपणारे पथक
लोकांना मदत करत सामाजिक भान जपत आहे. संदीप ढवळे व त्यांचे एकनिष्ठ सहकारी यांच्या सहकार्यामुळे हे पथक आपली कामगिरी सातत्याने टिकवून ठेवू शकत आहे.
समाजिक भान जपत आपली संस्कृती टिकवून ठेवणाऱ्या या जय जवान गोविंदा पथकाला सलाम.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













