उप प्रादेशिक कार्यालय पेण येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ चा सन्मान समारोप समारंभ संपन्न
प्रतिनिधी
रायगड (पेण) :- पेण येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या “रस्ता सुरक्षा अभियान २०२६” चा समारोप सोहळा १५ एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला शाळा–महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.रस्ते अपघातांचे प्रमाण कमी 
करणे आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जबाबदारीची भावना निर्माण करणे, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू होता. “स्वयंशिस्त हीच खरी रस्ता सुरक्षा” असा प्रभावी संदेश उपस्थितांना देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप विभागीय अधिकारी प्रवीण पवार होते, तर पोलीस उप अधीक्षक जालिंदर नालकूल यांची प्रमुख उपस्थिती होती. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विष्णू घोडे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.अभियानाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वकृत्व, चित्रकला आणि प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावर्षी विशेष आकर्षण ठरलेल्या “रस्ता सुरक्षा” विषयावरील रील स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार आणि ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली.तसेच, रायगड जिल्ह्यातील आदर्श रिक्षाचालक, मिनिडोर चालक आणि शालेय बस चालक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी अधिक जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













