रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे पर्यटनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला…
समुद्रात बुडून आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; सर्व मृतदेह सापडले!
रायगड / श्रीवर्धन (आ. मा. टॉ. टे. न्यू ) – पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून पर्यटनासाठी दिवेआगर, ता. श्रीवर्धन येथे आलेल्या विनार्स अकॅडमीच्या इयत्ता ११वी-१२वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी बुडून मृत्यूमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विनार्स अकॅडमीचे सुमारे ३० ते ४० विद्यार्थी पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते. यावेळी समुद्रात गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहींना पाण्याच्या खोलीचा व प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते बुडाले. या दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सर्व मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आले आहेत.मृत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :१) यश किरण वानखेडे २) सोहम तुकाराम भांडवलकर ३) तन्मय दत्तात्रय वाहिले ४) कौस्तुभ संदीप दौंड ५) कैवल्य वासनकर ६) राजवीर वहिले ७) प्रणव बनसोडे ८) सुमित अहिरे घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.या दुर्दैवी घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दिवेआगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













