ग्रामीण विकासाच्या कौशल्याधारित शिक्षणाला नवी दिशा :प्रा.डॉ.निनाद जाधव यांची चार पुस्तके प्रकाशित.
प्रतिनिधी
अण्णासाहेब जाधव यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त पुस्तकनिर्मितीचा उल्लेखनीय उपक्रम
ठाणे / भिवंडी :- ( आ. मा. टॉ. टे. न्यु. ) दि.२० शिक्षणमहर्षी पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त ग्रामीण विकास विषयाच्या अभ्यासासाठी उपयुक्त अशा प्रा.डॉ. निनाद विजय जाधव लिखित चार कौशल्याधारित पुस्तकांचे प्रकाशन 
करण्यात आले. बी. एन. एन. महाविद्यालय, भिवंडी येथील ग्रामीण विकास विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा.डॉ. निनाद विजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच व्यावहारिक ज्ञान व रोजगाराभिमुख कौशल्ये मिळावीत, या उद्देशाने ही पुस्तके लिहिली आहेत.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत कौशल्यवृद्धी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने ही पुस्तके तयार 
करण्यात आली आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, कृषीपूरक व्यवसाय, उद्योजकता, विमा, जोखीम व्यवस्थापन, अन्नप्रक्रिया, विपणन आणि रोजगाराच्या संधी यांचा व्यावहारिक दृष्टिकोनातून समावेश करण्यात आला आहे.प्रा.डॉ. निनाद विजय जाधव लिखित पुस्तकांमध्ये ‘ग्रामीण विकास कौशल्ये : जमीन सर्वेक्षण आणि आधुनिक तंत्रे’, ‘ग्रामीण विकास कौशल्ये : व्यावसायिक मधुमक्षिका पालन आणि व्यवस्थापन’, ‘ग्रामीण 
विकास कौशल्ये : अन्न प्रक्रिया आणि विपणन’ तसेच ‘ग्रामीण विकास कौशल्ये : विमा आणि जोखीम व्यवस्थापन’ या चार पुस्तकांचा समावेश आहे.जमीन सर्वेक्षण आणि आधुनिक तंत्रे या पुस्तकातून पारंपरिक मोजणी पद्धतींसोबत टोटल स्टेशन, GPS आणि ड्रोन सर्वेक्षण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली आहे. व्यावसायिक मधुमक्षिका पालन आणि व्यवस्थापन या पुस्तकातून मधुमक्षिकापालन, मध 
उत्पादन, मूल्यवर्धन, परागीभवन आणि रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.तसेच अन्न प्रक्रिया आणि विपणन या पुस्तकातून कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग, विपणन आणि ग्रामीण उद्योजकतेच्या संधी यांची माहिती देण्यात आली आहे. विमा आणि जोखीम व्यवस्थापन या पुस्तकातून कृषी विमा, पशुधन विमा, मालमत्ता विमा, आरोग्य विमा आणि जीवन विमा यांसह ग्रामीण कुटुंबांसाठी जोखीम व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे.या चारही पुस्तकांचा मुख्य उद्देश ग्रामीण विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी जोडलेले व्यावहारिक ज्ञान देऊन त्यांच्यामध्ये कौशल्य, उद्योजकता आणि रोजगारक्षमतेचा विकास करणे हा आहे. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्वावलंबनाकडे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांचा या पुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.प्रा.डॉ. निनाद विजय जाधव यांच्या या पुस्तकनिर्मितीमुळे ग्रामीण विकास विषयातील कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख साहित्यामध्ये महत्त्वाची भर पडली आहे. ही पुस्तके अर्हत पब्लिकेशन यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













