राष्ट्रीय स्तरावर मुंबई महाराष्ट्राचा ओम जयवंत भंडारी ठरला सुवर्ण युवक
प्रतिनिधी
चेन्नई :- चेन्नई येथील सत्यभामा विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सवात मुंबईच्या ओम जयवंत भंडारीने पाश्चात्य एकल वाद्य वादनाच्या अप्रतिम सादरीकरणातून सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना ओमने पाश्चात्य एकल वाद्य वादनाच्या संगीत प्रकारात देशभरातील १४२ विद्यापीठांमधून 
निवडून आलेल्या अव्वल स्पर्धकांशी चुरशीची स्पर्धा करत आपल्या कौशल्याची छाप पाडली. त्याच्या सुरेल, नेमक्या आणि प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकत तो स्पर्धेत अव्वल ठरला.या कामगिरीमुळे मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ओमच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वडील शाहीर जयवंत भंडारी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि ओमची सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द व समर्पण यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे.ओमच्या या यशस्वी वाटचालीमुळे संगीत क्षेत्रात त्याचे उज्ज्वल भविष्य असल्याचे स्पष्ट होत असून, विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













