श्वेता रानवडे खुन प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यासाठी रयत स्वाभिमानी संघटनेचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण
प्रतिनिधि पुणे
पुणे :- श्वेता रानवडे खून प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या चतुःशृंगी पोलिस स्टेशन मधील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. पीएसआय वैशाली सूळ यांना निलंबित करण्यात आले तर वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. प्राथमिक चौकशी मध्ये सूळ दोषी असल्याचे दिसून आले. परंतु दि १४/१२/२०२२ रोजी त्यांचे निलंबन रद्द करण्यात 
आले आणि त्यांना कोथरूड पोलिस स्टेशन या ठिकाणी बदली करण्यात आली. २२ दिवसांमध्ये असा कोणता चमत्कार झाला की पीएसआय वैशाली सुळ यांचे निलंबन रद्द करण्याची वेळ पुणे पोलिसांवर आली असा प्रश्न रयत स्वाभिमानी संघटनेकडून उपस्थित करण्यात येत आहे.खर तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघचौरे हे देखील या प्रकरणात तितकेच जबाबदार आहेत. मग यांच्या विरुद्ध तात्पुरती कारवाई का करण्यात आली? आपल्या पोलीस ठाण्यात काय सुरू आहे, याची माहिती साहेबांना नसेल का? असली तरी त्या बाबत तात्काळ कारवाई का झाली नाही? एकीकडे पोलीस आयुक्त कबूल करतात की श्वेता ने तक्रार केली होती, दुसरीकडे मात्र फक्त तपास अधिकाऱ्यांवरच कारवाई होते आणि ती कारवाई सुद्धा मागे घेतली जाते.

बातमी छापून आल्यानंतर खूप लोकांनी फोन करून वाघचौरे यांच्या विरुद्ध तक्रारी केल्या. इतकेच नव्हे त्यांच्या
सहकार्यांनी देखील त्यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली. निदान या सगळ्याची दखल घेऊन तरी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी योग्य ती कारवाई करायला हवी होती परंतु ही कारवाई झाली नाही. जेणेकरून पोलीस ठाण्यातील इतर ‘विषय’ बाजूला ठेवून तेथील अधिकारी थोडा वेळ अशा संवेदनशील केसेससाठी देतील आणि अशा घटना रोखता येतील. नविन पोलिस आयुक्त यांनी पदभार स्वीकारला त्याच दिवशी आम्ही रयत स्वाभिमानी संघटनेने तक्रार केली होती की वैशाली सुळ आणि राजकुमार वाकचौरे यांच्यावर कारवाई व्हायला हवी म्हणून आयुक्त आणि सह आयुक्त यांचेकडे १५/१२/२०२२ रोजी तक्रार केली होती आणि स्मरणपत्र देखिल दिले होते परंतु आजपर्यंत पुणे पोलिस आयुक्तांनी निलंबन आणि बडतर्फीची कारवाई केली नाही.त्यामुळे रयत स्वाभिमानी संघटना कडून २४ जानेवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे रविराज काळे यांनी सांगितले.
*रयत स्वाभिमानी संघटनेच्या प्रमुख मागण्या*:-
१) श्वेता रानवडे यांच्या तक्रार अर्जावर कसलीही कारवाई न करता तक्रार दफ्तरी करणाऱ्या पीएसआय वैशाली सुळ यांना कायमस्वरूपी सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे.
२) पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचौरे यांना बडतर्फ करण्यात यावे.
३) वैशाली सुळ यांच्याकडे देण्यात आलेल्या सर्व तक्रार अर्जांची चौकशी करण्यात यावी.
ज्या अधिकाऱ्यांनी तपासात हलगर्जीपणा केला अशा पीएसआय वैशाली सुळ यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे ते निलंबन मागे घेऊ नये .त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी रयत स्वाभिमानी संघटनेची मागणी आहे.वैशाली सुळ यांनी वेळीच श्वेता रानडे यांच्या तक्रारीवर कारवाई केली असती तर कदाचित आज आमची भगिनी श्वेता रानवडे आज आपल्यात असती.वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाकचौरे यांना विशेष शाखेशी संलग्न न करता त्यांना निलंबित करण्यात यावे आणि पीएसआय वैशाली सुळ यांना कायमस्वरूपी सेवेतुन बडतर्फ करावे अशी मागणी रयत स्वाभिमानी संघटनेचे सरचिटणीस रविराज काळे यांनी केली आहे. यावेळी रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख संघटक ऋषिकेश कानवटे उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













