वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या जीवनात अंगिकारला पाहिजे-अंनिसचे कार्याध्यक्ष सचिन गोवळकर

रत्नागिरी (खेड) :- भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांबरोबर आपल्याला कर्तव्ये देखील दिलेत. त्या कर्तव्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार , प्रसार व अंगीकार करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या जीवनात अंगिकारला पाहिजे. असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरीचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर यांनी केले.

न्यू इंग्लिश स्कुल करंजाली,दापोली येथे संविधान बांधिलकी महोत्सवाअंतर्गत संविधानातील कर्तव्याबाबत श्री.गोवळकर बोलत होते. यावेळी शाखा कार्याध्यक्ष सचिन शिर्के, शाळेचे मुख्याध्यापक टोकले सर, खोत सर, पाटील सर, काटकर मॅडम इत्यादी सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिन गोवळकर म्हणाले की,वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारण भाव तपासणे. प्रत्येक कार्यामागील कार्यकारण भाव निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती व प्रयोग याद्वारे विद्यार्थ्यांनी तपासला पाहिजे. विज्ञान नेहमी नम्र असतो. विज्ञान अंतिम सत्याचा दावा करत नाही. चमत्कार वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या कसोटीवर तपासता येतात. चमत्कारामागे विज्ञान किंवा त्या व्यक्तीची हातचलाखी असते. आजवर झालेली माणसाची प्रगती केवळ ‘विज्ञानाच्या’ आधारे झालेली आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विज्ञानाने दिलेल्या सगळ्या गोष्टी आपण वापरतो पण वैज्ञानिक दृष्टीकोन वापरत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार व कृती करण्याची पध्दती आहे. सत्यशोधनाचा मार्ग आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायला हवं असे श्री.गोवळकर यांनी सांगितले.
यावेळी श्री..सचिन शिर्के यांनी विद्यार्थ्यांना चमत्कार सादरीकरण करुन चमत्कारामागील वैज्ञानिक सत्य सांगितले.चमत्कार कोणत्याही दैवी शक्तीने करता येत नाही. चमत्कार कधीच घडत नसतात तर ते घडविले जातात. भोदूबुवा, हे चमत्कार घडवून आणतात. यामागे कोणतीही दैवी शक्ती नसते.

यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक टोकले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, आपल्या आजूबाजूला विविध प्रकारच्या अंधश्रद्धा घडताना दिसतात. याकडे आपण चौकस बुद्धीने , विवेकी विचारणे पहायला हवं. आपल्या आजूबाजूच्या समाजात बुवा, बाबा, महाराज यांच्यापासून होणाऱ्या फसवणूक व शोषण याबाबत प्रबोधन आपल्या विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













