रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजी पणाचा पनवेलकरांना बसतो आहे फटका…

रायगड (पनवेल) :- पनवेल आणि नवीन पनवेल ला ये जा करण्यासाठी रेल्वे पादचारी पुल आहे. हा एकमेव पादचारी पूल असल्यामुळे या पुलावरून हजारो प्रवासी ये जा करत असतात. परंतु या पुलाची फार दुरवस्था झालेली दिसते. पुलावर अनेक ठिकाणी बसवण्यात आलेल्या लाद्या निघालेल्या आहेत. तसेच पायऱ्यांच्या फरश्या ही काही ठिकाणी निघालेल्या आहेत. या पायऱ्यांवरून चालताना प्रवाश्यांना काळजीपूर्वक चढ उतार करावा लागतो. मागील बऱ्याच महिन्यांपासून या पुलाची दुरावस्था तशीच आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसते. आणि याचा फटका पनवेलकरांना बसत आहे.
दररोज सकाळी कामगार वर्ग कामावर जाण्यासाठी वेळेवर लोकल पकडण्यासाठी घाईत असतो. कारण त्याला वेळेवर कामावर पोहोचायचे असते. त्यामुळे तो जलद गतीने अथवा धावतच या पुलावरून जात येत असतो. त्यामुळे बहुतेक वेळा पुलाच्या पायऱ्यांवरून पडल्याच्या घटना ही या ठिकाणी घडल्या आहेत. परगावी जाणाऱ्या तसेच परगावाहून येणाऱ्या प्रवाश्यांना सामान अथवा जड बॅगा वर चढवताना अथवा खाली उतरवताना तारेवरची कसरत करावी लागते. गरोदर महिला, वयोवृद्ध नागरिक, दिव्यांग नागरिक यांची तर प्रचंड गैरसोय होते. अशा अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. तरीही रेल्वे प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.
या पुलाच्या दुरावस्थेमुळे आणि रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजी धोरणामुळे नागरिक प्रचंड नाराज असल्याचे दिसते. आणखी किती काळ नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे ? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
आम्ही याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी रेल्वे मास्टर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













