पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मंगळागौरी कार्यक्रम उत्साहात संपन्न!
प्रतिनिधी
ठाणे / भिवंडी :- (आ. मा. टॉ. टे. न्यु.) पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संस्थेच्या उपाध्यक्षा तथा पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा जाधव यांच्या अभिनव संकल्पनेतून शाळेत सानवी ग्रुप, डोंबिवली यांच्या माध्यमातून मंगळागौरीचा सुंदर आणि पारंपरिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षिका व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त 
सहभाग नोंदविला. सानवी ग्रुपमधील महिलांनी आपल्या समृद्ध महाराष्ट्रीय पारंपरिक संस्कृतीची मनोहारी झलक विविध उपक्रम, पारंपरिक खेळ आणि सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांसमोर अत्यंत प्रभावीपणे सादर केली.कार्यक्रमाच्या माध्यमातून लोप पावत चाललेल्या पारंपरिक खेळांची माहिती व त्यांचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगण्यात आले. तसेच एकीचे बळ, शिस्त, संयम, कौशल्य, संघभावना आणि वेळेचे नियोजन या गुणांचे महत्त्वही प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित करण्यात आले. केवळ दोन तासांच्या कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीने इतका सुंदर, शिस्तबद्ध आणि मनोरंजक कार्यक्रम सादर करता येतो, याचे उत्कृष्ट उदाहरण सानवी ग्रुपच्या महिलांनी घालून दिले.कार्यक्रमातील पारंपरिक खेळ, उत्साहपूर्ण वातावरण आणि सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थिनी, शिक्षकवर्ग तसेच उपस्थित मान्यवरांनी सानवी ग्रुपच्या महिलांचे आणि कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाचे भरभरून कौतुक केले.या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा तथा माजी मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा जाधव , अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुधीर घागस , उपमुख्याध्यापक श्री. आर. एस. शिंदे , माजी शिक्षिका सौ. पाटील तसेच सौ. सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी सहकार्य केले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे मंगळागौरीचा हा कार्यक्रम अत्यंत आनंददायी, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय ठरला.“परंपरा जपूया, संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया आणि एकतेच्या बळाने नवी पिढी घडवूया,” असा सुंदर संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













