महाराष्ट्रानंतर गोव्यातही विश्वासाची भक्कम पायाभरणी; कोकण मर्कंटाइलची नवी वाटचाल
प्रतिनिधी अमुलकुमार जैन
शेड्युल्ड’ दर्जाच्या दिशेने पाऊल; कोकण मर्कंटाइल बँकेच्या पणजी शाखेला हक्काची वास्तू
रायगड (अलिबाग ) :- (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि.२४ गोवा राज्याची राजधानी असलेल्या पणजी शहरात सन २००९ पासून भाड्याच्या जागेत कार्यरत असलेल्या कोकण मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पणजी शाखेने आता स्वतःच्या मालकीच्या जागेत प्रवेश केला आहे. बँकेचे अध्यक्ष आसिफ दादान यांच्या हस्ते २२ ऑगस्ट २०२६ रोजी नवीन शाखेचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. बँकेच्या विस्ताराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, हक्काच्या वास्तूमुळे खातेदारांनी समाधान व्यक्त केले.महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांत कार्यरत असलेल्या या मल्टी-स्टेट सहकारी बँकेचे जाळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीपासून गोव्यापर्यंत विस्तारले आहे. सध्या बँकेच्या एकूण २५ शाखा कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांत बँकेने ग्राहकाभिमुख सेवा आणि आधुनिक बँकिंग सुविधांवर भर दिल्याने खातेदारांचा विश्वास वाढत असल्याचे बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेत बँकेला ‘बेस्ट मल्टी-स्टेट बँक’
पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्ष आसिफ दादान यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बँकेच्या कामकाजाला अधिक गती मिळाली असून, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून बँकेची प्रगती सुरू असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.बँकेने २०२८ पर्यंत ‘शेड्युल्ड को-ऑपरेटिव्ह बँक’चा दर्जा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने आर्थिक शिस्त, ग्राहकसेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिला जात आहे. बँकेच्या सर्व शाखांमध्ये IFSC कोडची सुविधा उपलब्ध असून, ग्राहकांना RTGS, NEFT, IMPS आणि SMS अलर्ट यांसारख्या आधुनिक सेवा मिळतात. तसेच बँक ‘भारत बिल पेमेंट सिस्टम’शी जोडलेली आहे.कोकण मर्कंटाइल बँकेची सुरुवात १९६९ मध्ये केवळ १०५ सभासद आणि ११ हजार २०० रुपयांच्या भागभांडवलावर ‘रत्नागिरी मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ म्हणून झाली. स्थानिक व्यावसायिक आणि विचारवंतांनी कोकणातील नागरिकांना बँकिंग प्रवाहाशी जोडण्याच्या उद्देशाने संस्थेची स्थापना केली होती. वाढता विस्तार आणि लोकप्रियता लक्षात घेऊन १९७७ मध्ये संस्थेचे नामकरण ‘द कोकण मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’ असे करण्यात आले.पणजी शाखेच्या उद्घाटनप्रसंगी व्हाइस चेअरमन असगर डबीर, संचालक समीर मुल्ला, अल्ताफ काझी, दिलीप मुजावर, तसनिम काझी, सीईओ अकबर कोंडकरी, सत्तार शेख, रफिक शेख, नूर मुकादम, युनियन लीडर अझीम, मुनीर, इरफान, पटेल, मतीन, नौशाद दळवी यांच्यासह बँकेचे खातेदार, हितचिंतक आणि कर्मचारी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













