भिवंडी तालुक्यात ग्रामसेवक संघटनेचा ग्रामसभांवर बहिष्कार; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…
प्रतिनिधी
ठाणे ( भिवंडी ) :- (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि.२४ जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिरवेर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी स्व. पी. एन. पाटील यांच्या दुर्दैवी निधनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या भिवंडी तालुका शाखेने राज्य व जिल्हा संघटनेच्या निर्णयानुसार दि. १८ ऑगस्ट २०२६ पासून आयोजित ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी, पंचायत समिती भिवंडी यांना देण्यात आले आहे.ग्रामपंचायत अधिकारी स्व. 
पी. एन. पाटील यांचे कामकाज पार पाडत असताना आलेल्या अमानुष दबावामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप संघटनेने केला असून, या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या घटनेमुळे ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.भिवंडी तालुक्यातील अनेक ग्रामसभांमध्ये वाद-विवाद, शिवीगाळ, धमकी तसेच छोट्या-छोट्या तक्रारींच्या माध्यमातून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर अनावश्यक दबाव आणला जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत अधिकारी निर्भय वातावरणात काम करू शकत नसून, त्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.संघटनेच्या निर्णयानुसार ग्रामसभेचे आयोजन व संचालन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी स्वीकारू नये तसेच ग्रामसभांना उपस्थित राहू नये, अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी तालुक्यात नियोजित असलेल्या ग्रामसभांबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निर्भय वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या भिवंडी तालुका शाखेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष निलेश सुधा सुरेश म्हात्रे, सचिव परेश कांता कांचन सोनावणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन सादर केले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













