गुरुकृपा मित्र मंडळाचे“नियोजन आणि सेवाभाव कौतुकास्पद” — डॉ. अशोक महाजन
प्रतिनिधी
भिवंडी ते शिर्डी पदयात्रेचा रौप्यमहोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न!
ठाणे (भिवंडी) :- ( आ. मा. टॉ. टे. न्यू ) गुरुकृपा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित साईनामाचा गजर, श्रद्धा-सबुरीचा संदेश आणि आरोग्याचा जागर करीत भिवंडी ते शिर्डी या सुमारे २२० किलोमीटरच्या पदयात्रेने यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष मोठ्या उत्साह पुर्ण वातावरणात शिर्डी नगरीत साजरे केले.या पदयात्रेच्या निमित्ताने
आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक शांताबाई महादु महाजन, गुरुकृपा मित्र मंडळाचे संस्थापक व मार्गदर्शक डॉ. अरुण काशीनाथ पाटील, डॉ. सौ. कृतिका अरुण पाटील, धर्मसेवक डॉ. श्री. सोन्या काशीनाथ पाटील, संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील
यांच्यासह सेवाभावी कार्यकर्ते व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.“साईनामाचा गजर आणि आरोग्याचा जागर!” या ब्रीदवाक्याने प्रेरित असलेली ही पदयात्रा केवळ धार्मिक श्रद्धेची वाटचाल नसून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक इच्छाशक्ती, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश देणारा अनोखा उपक्रम ठरला आहे.सुमारे २५ वर्षांपूर्वी डॉ. अरुण पाटील आणि त्यांचे सहकारी डॉ. जेजे सिंग यांच्या मनात 
शिर्डीला पायी जाण्याची संकल्पना रुजली. २००२ मध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी अवघ्या चार-पाच साईभक्तांनी या पदयात्रेला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ऊन, वारा, पाऊस, अंधार आणि विविध अडचणींचा सामना करीत दररोज सुमारे ६० ते ६५ किलोमीटरचा पायी प्रवास करण्यात आला. पुढे सहभागी साईभक्तांची संख्या वाढत गेली आणि आज ५० ते ६० साईभक्त या 
पदयात्रेत सहभागी होत आहेत.या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे १६ वर्षांच्या तरुणांपासून ६० ते ६५ वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ नागरिक एकाच श्रद्धेने आणि उत्साहाने पायी प्रवास करतात. त्यामुळे या उपक्रमातून दोन पिढ्यांना जोडणारा प्रेरणादायी सेतू निर्माण झाला आहे.सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत व्यायाम 
आणि चालण्यासाठी वेळ मिळत नसल्याची कारणे दिली जात असताना, गुरुकृपा मित्र मंडळाचे साईभक्त प्रत्यक्ष कृतीतून “चालत राहा, निरोगी राहा आणि साईनामाचा जप करा” असा संदेश समाजाला देत आहेत. साडेतीन दिवसांत सुमारे २२० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी शारीरिक क्षमता, मानसिक तयारी आणि 
प्रबळ इच्छाशक्तीची आवश्यकता असते.या पदयात्रेत काही साईभक्त साडेतीन दिवस अन्नप्राशन न करता केवळ द्रवपदार्थांचे सेवन करीत पायी प्रवास करतात, हीदेखील या यात्रेतील विशेष बाब असल्याचे आयोजकांनी सांगितले.या पदयात्रेच्या यशस्वी
आयोजनामध्ये डॉ. अरुण पाटील यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. कृतिका अरुण पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे तसेच त्यांचे नियोजन उल्लेखनीय आहे. पदयात्रेपूर्वी मार्गाची पाहणी, मुक्कामाच्या ठिकाणांची व्यवस्था, शुद्ध शाकाहारी भोजन, पिण्याचे पाणी, औषधे आणि आरोग्यविषयक आवश्यक सुविधा यांचे
नियोजन त्या जबाबदारीने करतात.या पदयात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामागील निःस्वार्थ भाव. पदयात्रेसाठी लागणारा बहुतांश आर्थिक खर्च डॉ. अरुण पाटील स्वतः करतात. देणगी अथवा आर्थिक मदत स्वीकारली जात नाही. मात्र, साईभक्त म्हणून काही सेवाभावी व्यक्ती स्वेच्छेने आपली सेवा या उपक्रमाशी जोडतात.विनोद पाटील यांनी पदयात्रींसाठी पिण्याचे पाणी व साहित्य वाहून नेण्यासाठी दोन टेम्पोची व्यवस्था केली आहे. फाईव्ह स्टार ग्रुपचे राहुल मढवी, मनीष मढवी, प्रबोध पाटील व त्यांचे सहकारी शुद्ध पाणी तसेच आपत्कालीन सेवांची जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या सात-आठ वर्षांपासून उरण येथील महिला मंडळाकडून शुद्ध व सात्त्विक भोजनाची सेवा दिली जात आहे.“पंचवीस वर्षांचा प्रवास अभिमानाचा” — डॉ. अरुण पाटीलयावेळी मनोगत व्यक्त करताना पदयात्रेचे प्रमुख डॉ. अरुण पाटील म्हणाले की, व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉ. अशोक महाजन हे माझे व्याही असूनही कार्यक्रमातील व्यस्तता बाजूला ठेवून त्यांनी वेळ दिला, ही माझ्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी अभिमानाची बाब आहे. मोठ्या बंधूंच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याचे आयोजन सातत्याने करीत आलो आहे. आज ते आपल्यात नसल्याची कमतरता कायम जाणवते.“माझ्यासोबत असलेल्या सर्व साईभक्तांना समान वागणूक दिली जाते. कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी समान सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सुरुवातीला अवघ्या चार जणांनी सुरू केलेल्या या पालखी सोहळ्याला आज पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत, याचा मनस्वी अभिमान आहे,” असे सांगत त्यांनी सर्व सहकारी, सेवाभावी कार्यकर्ते आणि साईभक्तांचे आभार मानले.“नियोजन आणि सेवाभाव कौतुकास्पद” — डॉ. अशोक महाजनप्रमुख पाहुणे डॉ. अशोक महाजन यांनी पदयात्रेच्या नियोजनाचे कौतुक केले. ते म्हणाले, “या पालखी सोहळ्याचे अत्यंत चांगले नियोजन करण्यात आले असून ते मी प्रत्यक्ष दोन दिवसांत अनुभवले आहे. आयोजक डॉ. अरुण पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करणे आवश्यक आहे.”“या पालखीसोबत चालणाऱ्या साईभक्तांना श्रद्धेतून प्रेरणा मिळते. भिवंडी-शिर्डी पदयात्रेबरोबरच पंढरीच्या वारीतही सेवा देणे ही कौतुकास्पद बाब आहे. डॉक्टर म्हणून सेवा बजावताना समाजसेवेलाही प्राधान्य देणारे डॉ. अरुण पाटील यांचे कार्य अभिमानास्पद आहे,” असेही डॉ. अशोक महाजन यांनी सांगितले.श्रद्धा, सबुरी आणि माणुसकीचा संदेश साईबाबांचा “श्रद्धा आणि सबुरी” हा संदेश आत्मसात करीत मानवसेवा, परस्पर प्रेम, सहकार्य आणि गरजूंच्या मदतीचा विचार या पदयात्रेतून पुढे नेला जात आहे. “पाय शिर्डीकडे चालत असले, तरी मन माणुसकीच्या दिशेने चालत आहे,” अशी भावना या उपक्रमातून व्यक्त होत आहे.मोबाईल, इंटरनेट आणि धावपळीच्या युगात तरुण पिढीला शारीरिक श्रम, निसर्ग, अध्यात्म आणि सेवाभाव यांची सांगड घालणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. गेल्या पंचवीस वर्षांत अनेक खडतर प्रसंगांना सामोरे जात ही पदयात्रा अखंड सुरू ठेवण्यात आली असून, आता ती पुढील पिढीसाठी श्रद्धा, शिस्त, आरोग्य आणि सेवाभावाचा मौल्यवान वारसा ठरत आहे.रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या या पवित्र पदयात्रेच्या निमित्ताने डॉ. अरुण पाटील, डॉ. जेजे सिंग, डॉ. कृतिका पाटील, सर्व साईभक्त, सेवाभावी कार्यकर्ते, महिला मंडळ तसेच पाणी व आपत्कालीन सेवा देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.साईनाम ओठांवर असू दे, साईसेवा हातून घडू दे आणि आरोग्याचा संदेश घराघरात पोहोचू दे,” या भावनेने भिवंडी ते शिर्डी पदयात्रेचा हा भक्तिमय प्रवास अखंड सुरू राहावा, अशी साईचरणी प्रार्थना करण्यात आली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













