ज्ञानसाधना, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासनाचा संगम म्हणजेच प्रा. डॉ. अशोक महाजन
प्रतिनिधी
शिर्डी (आ. मा. टॉ. टे. न्यू) :- ज्ञानाची साधना, संशोधनाची निष्ठा, प्रशासनाची शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची तळमळ यांचा सुंदर संगम म्हणजे प्रा. डॉ. अशोक शांताबाई महादु महाजन होय, असे गौरवोद्गार गुरुकृपा मित्र मंडळ शिर्डी पदयात्रेच्या रौप्य महोत्सवी (२५) वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा .विनायक म्हसकर यांनी परिचय देताना व्यक्त केले.गुरुकृपा मित्र मंडळ शिर्डी 
पदयात्रेचे प्रमुख डॉ. श्री. अरुण काशीनाथ पाटील यांच्या निमंत्रणावरून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अशोक शांताबाई महादु महाजन यांची या भक्तिमय आणि प्रेरणादायी सोहळ्यात प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि प्रशासकीय कार्याचा गौरवपूर्ण परिचय करून देण्यात आला.प्रा. डॉ. अशोक शांताबाई महादु महाजन हे केवळ ज्येष्ठ प्राध्यापक नसून अध्यापन, संशोधन, 
विद्यापीठ प्रशासन, नवतंत्रज्ञान तसेच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे बहुआयामी शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांना ३८ वर्षांहून अधिक काळाचा अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासनाचा अनुभव आहे.त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील मोठा काळ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे गेला. या विद्यापीठात त्यांनी Senior Professor, School of Physical Sciences चे संचालक तसेच Department of Electronics चे प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. याशिवाय विद्यापीठाचे Registrar म्हणून तब्बल पाच वर्षे त्यांनी प्रशासकीय जबाबदारी पार पाडली.Microelectronics आणि
Nanoelectronics हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख क्षेत्र असून Thin Films, High-k व Low-k Materials, MOS Capacitors, MIM Capacitors, 2D Materials आणि Semiconductor Devices यांसारख्या अत्याधुनिक विषयांवर त्यांनी सातत्याने संशोधन केले आहे. त्यांच्या नावावर २२१ संशोधन शोधनिबंध असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ११ संशोधकांनी Ph.D. पूर्ण केली आहे.Principal Investigator म्हणून त्यांनी नऊ मोठे संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. UGC, CSIR, DST आणि DST Nano Mission यांसारख्या राष्ट्रीय संस्थांकडून या प्रकल्पांना निधी मिळाला असून त्यांची एकत्रित किंमत सुमारे ३.०७ कोटी रुपये आहे.संशोधनाला प्रयोगशाळेची जोड मिळावी, या उद्देशाने त्यांनी KBC उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात Materials and Devices Laboratory for Nanoelectronics उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे या प्रयोगशाळेचे रूपांतर Class 10,000 Clean Room मध्ये करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष संशोधनाची संधी उपलब्ध झाली.डॉ. अशोक शांताबाई महादु महाजन यांच्या संशोधन कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाली आहे. अमेरिका, जपान, तैवान, चीन, मलेशिया आणि सिंगापूर येथील विद्यापीठे व संशोधन संस्थांशी त्यांनी शैक्षणिक व संशोधन सहकार्य केले आहे. चीन सरकारने त्यांची ‘Overseas Famous Teacher’ म्हणून निवड केली होती. तसेच त्यांनी विविध परदेशी विद्यापीठांमध्ये Visiting Professor म्हणूनही कार्य केले आहे.आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याच्या क्षेत्रात ERASMUS+ CABCIN Consortium Project चे समन्वयन ही त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाची कामगिरी मानली जाते. सुमारे €९४०,००० निधीच्या या प्रकल्पात युरोप व भारतातील विद्यापीठांचा सहभाग होता. उच्च शिक्षणातील क्षमता-वृद्धी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला या प्रकल्पाच्या माध्यमातून चालना मिळाली.संशोधन क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना भारतीय पेटंट क्रमांक ४४४९९५ प्राप्त झाले आहे. Plasma-Enhanced Atomic Layer Deposition (PEALD) प्रणालीशी संबंधित हे पेटंट स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांच्या संशोधनाची महत्त्वपूर्ण पावती मानली जाते.सध्या प्रा. डॉ. अशोक शांताबाई महादु महाजन हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे प्र-कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, संशोधन व नवोपक्रमाला प्रोत्साहन देणे, उद्योगाशी शिक्षणाची सांगड घालणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, या बाबींना त्यांच्या कार्यात विशेष महत्त्व आहे.उच्च शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे माध्यम नसून ज्ञान, संशोधन, कौशल्य आणि समाजोपयोगी दृष्टिकोन विकसित करण्याचे प्रभावी साधन आहे, हा त्यांच्या कार्याचा मूलभूत संदेश आहे.ज्ञानसमृद्ध, संशोधनशील आणि दूरदृष्टी असलेल्या प्रा. डॉ. अशोक शांताबाई महादु महाजन यांच्या कार्याचा गुरुकृपा मित्र मंडळ शिर्डी पदयात्रेचे प्रमुख डॉ. श्री. अरुण काशीनाथ पाटील व डाॅ.सौ.कृतिका अरूण पाटील यांनी शाल,पुष्पगुच्छ व विठ्ठल रखुमाई ची मुर्ती भेट देऊन विशेष गौरव केला.तर उपस्थित साई भक्तांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी शैक्षणिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना आणि शिक्षणक्षेत्राला सातत्याने मिळत राहावा, अशी सदिच्छाही यावेळी उपस्थित सर्वानी व्यक्त केली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













