जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग येथे विधी स्वयंसेवक (PLV) प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी
रायगड (अलिबाग) :- दि.१ (आ.मा.टॉ.टे.न्यू)प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबागचे अध्यक्ष एस.बी.अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांच्या वतीने विधी स्वयंसेवक (PLV) प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या प्रारंभी ॲड. तनुष्का पेडणेकर यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षण कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. प्रशिक्षण कार्यक्रमात डेप्युटी चीफ LADCS ॲड. मनीषा नागावकर यांनी 
पीसी अँड पीएनडीटी (PC & PNDT) कायदा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी पीसी अँड पीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंधासाठी समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यावर विशेष भर दिला. मुलगा-मुलगी समानतेचा विचार समाजात रुजवून स्त्री भ्रूणहत्येसारख्या सामाजिक अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.डॉ. विनायक पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले की, सोनोग्राफीसाठी आलेल्या गर्भवती महिलेवर पीसी अँड पीएनडीटी कायद्यानुसार कोणतीही कारवाई केली जात नाही. मात्र गर्भलिंग निदानासारख्या बेकायदेशीर प्रकारात सहभागी असलेल्या डॉक्टरांवर तसेच संबंधित नातेवाईकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई व शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अशा प्रकारांविरोधात समाजात जनजागृती निर्माण करून कायद्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.यानंतर PLV सुशील सायकर यांनी विधी स्वयंसेवकांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या तसेच आदर्श PLV कसा असावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. समाजातील वंचित, गरजू व दुर्बल घटकांपर्यंत मोफत कायदेशीर मदत पोहोचविण्यात विधी स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.PLV शैलेश कोंडस्कर यांनी क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन, विविध शासकीय योजनांची माहिती आणि वेळेवर मदत कशी करावी, याबाबत त्यांनी प्रत्यक्ष अनुभव कथन केले. त्यांच्या अनुभवांमुळे उपस्थित विधी स्वयंसेवकांना समाजसेवेची प्रेरणा मिळाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती रेवत कंटे यांनी विधी स्वयंसेवकांनी कायदेशीर चौकटीत राहून गरजू नागरिकांना मोफत कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, असे आवाहन केले.कार्यक्रमास ॲड. अनंत डी. पाटील, उपाध्यक्ष, वकील संघटना, अलिबाग यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी, पॅनेल वकील, विधी स्वयंसेवक तसेच प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या विधी स्वयंसेवकांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नव्हते, त्यांच्यासाठी दृकश्राव्य (ऑनलाईन) यंत्रणेद्वारे प्रशिक्षण व मार्गदर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विधी स्वयंसेवकांना या प्रशिक्षणाचा लाभ घेता आला.कार्यक्रमाच्या शेवटी ॲड. तनुष्का पेडणेकर यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे आभार मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमातून विधी स्वयंसेवकांना कायदेविषयक ज्ञान, सामाजिक उत्तरदायित्व, मोफत कायदेशीर सहाय्य आणि जनजागृतीचे महत्त्व याविषयी मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













