८ ऑगस्ट नंतर शिक्षकांना BLO/SIR कामकाजातून तात्काळ कार्यमुक्त करावे : अनिल बोरनारे
प्रतिनिधी मनिलाल शिंपी
मुंबई (ठाणे) :- निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (SIR-2026) मोहिमेअंतर्गत बीएलओ (BLO) म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ नंतर तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे.यासंदर्भात संबंधित प्रशासन व शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले असून, SIR-2026 मोहिमेची अंतिम मुदत ०८ ऑगस्ट २०२६ असल्याने त्यानंतर शिक्षकांना BLO/SIR संबंधित जबाबदाऱ्यांमधून मुक्त करून नियमित अध्यापन कार्यासाठी शाळेत उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात यावी, अशी 
मागणी करण्यात आली आहे.याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अनिल बोरनारे म्हणाले,”शिक्षकांचे मुख्य कार्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे आहे. BLO/SIR ही जबाबदारी निवडणूक प्रक्रियेसाठी महत्त्वाची असली तरी तिची मुदत पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि शाळांमधील नियमित अध्यापन सुरळीत ठेवण्यासाठी ०८ ऑगस्ट २०२६ नंतर सर्व शिक्षकांना BLO/SIR कामकाजातून मुक्त करण्यात यावे.”बोरनारे यांनी पुढे सांगितले की, राज्यातील अनेक शाळांमधील शिक्षक सध्या BLO म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे शाळांतील अध्यापनावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम पूर्णतेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तसेच CPS प्रशासनाने तातडीने आदेश जारी करून शिक्षकांना कार्यमुक्त करावे.शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभागाने या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली असून विद्यार्थीहिताला प्राधान्य देत शिक्षकांना त्यांच्या मूळ शैक्षणिक जबाबदाऱ्यांकडे परत पाठविण्याची मागणी केली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













